Home ब्रेकिंग न्यूज पालिका कर्मचा-यांचा संपाला पाठिंबा

पालिका कर्मचा-यांचा संपाला पाठिंबा

..तर पालिका कर्मचारीही संपात उतरतील, समन्वय समितीचा इशारा

by Vishnu Sonawane

मुंबई – जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यभरातील सुमारे १८ लाख कर्मचारी मंगळवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. या संपात मुंबई महापालिका कर्मचारी सहभागी न होता मोर्चा काढून संपाला पाठिंबा दिला. कामगार कर्मचारी संघटना समन्वय समितीने पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांची भेट घेऊन जुन्या पेन्शन लागू करण्याबाबत चर्चा केली. अधिवेशनानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल असे सकारात्मक आश्वासन आयुक्तांनी दिले आहे. मात्र याकडे दुर्लक्ष झाल्यास पालिका कर्मचा-यांनाही संपात उतरावे लागेल असा इशारा समन्वय समितीने दिला आहे.

 जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्यभरातील सरकारी, निमसरकारी शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी आक्रमक झाले आहेत. या मागणीसाठी राज्यभरातील सुमारे १८ लाख कर्मचा-यांनी बेमुदत संप पुकारला आहे. मुंबई महापालिकेतील शेकडो कर्मचा-यांनी संपात सहभागी न होता आझाद मैदानात मोर्चा काढून संपाला पाठिंबा दिला. पालिका ही स्वायतत्ता संस्था असून जुनी पेन्शन योजना लागू करणे प्रशासनाला शक्य आहे. यासाठी समन्वय समितीने मंगळवारी पालिका आयुक्तांची भेट घेऊन या मागणीबाबत चर्चा केली. पालिका आयुक्त या मागणीवर सकारात्मक असून अधिवेशनानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे पालिका कर्मचारी संपात उतरणार नाहीत, मात्र राज्य सरकारी कर्मचा-यांच्या संपाला पाठिंबा दिला जाईल. पालिका स्वायत्तता संस्था असून जुनी पेन्शन योजना लागू करणे पालिकेला शक्य आहे. याकडे आयुक्तांचे लक्ष वेधण्यात आले आहे. मात्र आयुक्तांनी दुर्लक्ष केले व राज्य़ सरकारनी सरकारी कर्मचा-यांचा संप चिरडण्याचा प्रयत्न केल्यास पालिका कर्मचारीही संपात उतरण्याची भूमिका घेईल, असा इशारा समन्वय समितीचे बाबा कदम, प्रकाश देवदास, रमाकांत बने आदींनी दिला आहे.
समन्वय समितीने पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. बैठकी दरम्यान २००८ पासून सुरु केलेली नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी. सर्व संवर्गातील रिक्त पदे त्वरित भरण्यात यावी. कंत्राटी कामगारांना मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत सामावून घ्यावे या मागण्या संघटनेने केल्या आहेत. या बैठकीनंतर समन्वय समितीच्या अशोक जाधव, बाबा कदम, अॅड प्रकाश देवदास आदी पदाधिकाऱ्यांनी आझाद मैदानात कामगारांना संबोधित केले.  यावेळी बोलताना, पालिकेच्या एक लाख कर्मचाऱ्यांपैकी ८० हजार कर्मचारी समन्वय समितीसोबत आहेत. यामुळे जुनी पेन्शन योजना कर्मचाऱ्यांना लागू करावीच लागेल. दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा समन्वय समितीचे निमंत्रक प्रकाश देवदास यांनी दिला आहे. यावेळी संपूर्ण मुंबई महापालिका ठप्प होईल अशी तयारी कारवी लागेल असेही देवदास म्हणाले. जुनी पेन्शन योजना कशी योग्य आहे याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. पालिका आयुक्तांनी अद्याप एनपीएमध्ये पेन्शनची रक्कम गुंतवणूक केलेली नाही, त्यामुळे ही रक्कम जुन्या पेन्शन योजनेत गुंतवून पालिका कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी करण्यात आली. आम्ही दोन दिवस वाट बघू. राज्य सरकारने योग्य निर्णय घेतला नाही तर पालिका कर्मचारीही आंदोलनात उतरतील असे युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी सांगितले.
………..

You may also like

न्यूज स्पार्क

बातम्यांचा सखोल आढावा

कविता विष्णू सोनावणे

संपादक

Kavita Vishnu Sonawane

Editor

इमेल अपडेट

न्यूज स्पार्क – बातम्यांचा सखोल आढावा @ २०२५ सर्व अधिकार राखीव

रचना आणि मांडणी – बियॉंड वेब