मुंबई – राज्यातील शेतक-यांना राज्य सरकारने पिक विम्याचे संरक्षण देण्याचा निर्णय घेतला असून शेतक-यांना १ रुपयात पीक विमा योजनेचा लाभ दिला जाणार आहे. शिंदे सरकारचा अर्थसंकल्प आज उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडला.
विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडला. त्यामुळे शेतपीकांचे मोठे नुकसान झाले. विदर्भातील अमरावती, बुलडाण्यात गारपीट झाली. शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने अन्नधान्य आणि भाजीपाला कवडीमोल भावाने विकावा लागल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शेतक-यांच्या आत्महत्या वाढत आहेत. त्यामुळे पीकाला हमी भाव देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. विरोधी पक्ष शेतक-यांच्या मागण्यांवर विधीमंडळाच्या अधिवेशनात आवाज उठवित आहेत. शेतक-यांना या अर्थसंकल्पाने मोठा दिलासा दिल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
काय मिळणार शेतक-यांना?
या अर्थसंकल्पात शेतक-यांना निधी, पीक विमा, वीज, इतर सोयी सुविधा देण्याची घोषणा करण्यात आली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य सरकारची भर, शेतक-याला प्रत्येकी दरवर्षी राज्याचे ६००० रुपये आणि केंद्र सरकारचे ६००० रुपये दरवर्षी देणार, १.१५ कोटी इतका शेतक-यांच्या कुटुंबाना लाभ मिळणार, ६९०० कोटी रुपयांचा भार राज्य सरकार उचलणार, राज्यातील शेतक-यांना केवळ १ रुपयात पीक विमा, राज्यातील शेतक-यांना कर्जमाफी योजनांचे मिळणार लाभ, आदी योजनांची घोषणा राज्य सरकारने केली आहे.