मुंबई – म्हाडाच्या पुणे मंडळामार्फत काढण्यात येत असलेल्या ६ हजार ५८ सदनिकांच्या सोडतीमध्ये ५८ हजार ४६७ अर्जदारांनी अनामत रक्कम भरून सहभाग नोंदविला आहे. या अर्जाची सोडत सोमवारी २० मार्च २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे ऑनलाईन पध्दतीने पार पडणार आहे. तर ऑनलाईन सोडतीचा कार्यक्रम पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, गृहनिर्माण भवन, आगरकर नगर, पुणे येथे होणार आहे.
पुणे मंडळाने पुणेकरांना नवीन वर्षाची भेट देत विविध योजनांमधील ६०५८ सदनिकांच्या संगणकीय सोडतीची घोषणा केली. त्यानुसार सोडतीसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशनचा शुभारंभ ५ जानेवारी २०२३ रोजी करण्यात आला. या सोडतीमध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य अंतर्गत २९३८ सदनिका, २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजन अंतर्गत २४८३ सदनिका व प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ६३७ अशा एकूण ६ हजार ५८ सदनिकांचा सोडतीमध्ये समावेश आहे. या सदनिकांसाठी ५८ हजार ४६७ अर्जदारांनी अनामत रक्कम भरून सोडतीमध्ये सहभाग नोंदवला आहे.