मुंबई – विचारधारेशी तडजोड न करता राही भिडे यांनी पत्रकारिता केली. त्यांचे “माध्यमाच्या पटावरून” हे पुस्तक राज्याच्या सामाजिक, राजकीय जीवनाचे तसेच सामान्यांच्या जगण्याचे टीपण आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी केले. त्यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार भिडे यांच्या “माध्यमाच्या पटावरून” या आत्मचरित्राचे प्रकाशन झाले.
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने आज पत्रकार भवनात ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांच्या “माध्यमाच्या पटावरून” या आत्मचरित्राचे प्रकाशन झाले. यावेळी शरद पवार बोलत होते. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गो-हे, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, साहित्यिक अर्जून डांगळे, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, ज्येष्ठ पत्रकार सुजाता आनंदन, प्रकाशक येशू पाटील आदी उपस्थित होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी नरेंद्र वाबळे होते.
बीड जिल्ह्यातील आष्टी या गावात राही भिडे यांचे बालपण गेले. तेथील साखर उद्योग, सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचा संदर्भ देत पवार म्हणाले की या सामाजिक परिस्थित त्यांची जडणघडण झाली आहे. आंबेडकरी विचारधारा त्यांनी जोपासली. याच विचारधारेतून भिडे यांची जडणघडण झाली आहे, त्यांनी त्यांच्या विचारधारेशी कधीडी तडजोड केली नाही. त्यांचे हे पुस्तक सामाजिक, राजकीय परिस्थितीचे तसेच सामान्यांच्या जगण्याचे टीपण असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पत्रकारितेतील बदलाविषय़ी या पुस्तकात भिडे यांनी चिंता व्यक्त केली. त्याविषयी पवार म्हणाले की, हा बदल सरसकट असेल तर त्याचा विचार केला पाहिजे असेही ते म्हणाले.
राही भिडे यांची पत्रकारिता ही निर्भिड आणि बेधडक आहे. ही आत्मकथा वेदनेने भरलेली आहे. ती कर्तूत्वाच्या दुनयेवर प्रभाव टाकणारी आहे. 1998 पासून आतापर्यंतच्या राजकीय जीवनावर परखड भाष्य करणारे हे पुस्त असल्याचे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे म्हणाले. कामगार कपात आणि पत्रकारितेचे पीआरने व्यापणारे क्षेत्र याबद्दल राही भिडे यांनी खेद व्यक्त केला.