मुंबई – न्याय देवतेच्या डोळ्यावर पट्टी असली तरी, ही न्याय देवता आपल्या देशातील लोकशाहीचे वस्त्रहरण होवू देणार नाही, असा ठाम विश्वास शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
महाविकास आघाडीची बैठक आज यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पार पडली. या बैठकीस कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना या पक्षांचे मुख्य नेते उपस्थित होते. यावेळी ठाकरे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी असते. पण मला पूर्ण खात्री आहे की, न्याय देवतेच्या डोळ्यावर पट्टी असली तरी आपल्या देशातील लोकशाहीचे न्याय देवता वस्त्रहरण होवू देणार नाही. ठाकरे यांनी भाजपावर यावेळी त्यांनी जोरदार हल्ला चढविला. ते म्हणाले की, देशात सद्या भाजपात या नाहीतर तुरूंगात जा,अशी स्थिती आहे. मात्र महाराष्ट्राने देशाला दिशा दाखविली आहे. ही लढाई केवळ शिवसेनेची नाही. आपले सरकार सत्तेवर येणारच, पण सरकार स्थापन कशासाठी करायचे याचे उत्तर जनतेला द्यायला हवे असेही ते म्हणाले.
तीन स्तंभांची लागली विल्हेवाट
लोकशाहीच्या तीन स्तंभावरही उध्दव ठाकरे यांनी टीका केली. ते म्हणाले, लोकशाहीचे चार स्तंभ असतात. यातील तीन स्तंभांची विल्हेवाट लागली आहे. यातील महत्वाचा स्तंभ आहे तो प्रसार माध्यमे. पत्रकारांच्या हाती नेहमी कलम असायला पाहिजे, मात्र आजकालच्या ब-याच पत्रकारांच्या हाती कमल असल्याचा मार्मिक टोला त्यांनी लगावला.